महागाव तालुक्यात अवैध माती उत्खनन खुलेआम; महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील करंजखेड, वेणी, डोंगरगाव, (आमणी खुर्द) परिसरात ई-क्लास व वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन खुलेआम सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकाराकडे महसूल अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
विश्वसनीय माहितीनुसार, काही ठराविक जागांसाठी पाच-पाच ब्रासची परवानगी घेतली जाते; मात्र प्रत्यक्षात २५ ब्रासपेक्षा अधिक माती काढली जात असून दररोज हजारो ट्रिपा सुरू आहेत. असे असतानाही संबंधित अधिकारी साधी पाहणीही करत नसल्याने अवैध उत्खननाला अप्रत्यक्ष पाठींबा मिळत असल्याची चर्चा आहे.
महागाव परिसरात वीटभट्ट्यांचा सुळसुळाट झाला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले जात आहे. याचा थेट परिणाम शेतजमिनी, पर्यावरण व भूजल पातळीवर होत असून भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
या अवैध उत्खननावर तात्काळ आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



