हिमायतनगर: प्रशासक नेमणुकीस सरपंच संघटनेचा तीव्र विरोध; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन

हिमायतनगर (प्रतिनिधी) शेख खयुम खूरेशी
महाराष्ट्र सरकारकडून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू असतानाच, हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेने या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर लक्ष्मणराव गोपतवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठवून तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न?
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायती या ग्रामीण लोकशाहीचा कणा आहेत. प्रशासक नेमणे हे लोकशाहीविरोधी असून यामुळे गावाच्या विकास प्रक्रियेला खीळ बसणार आहे. लोकनियुक्त सरपंच आणि सदस्यांनाच गावातील समस्यांची खरी जाण असते, असेही संघटनेने नमूद केले.
प्रमुख मागण्या:
प्रशासक पद्धत रद्द करून लोकप्रतिनिधींनाच अधिकार द्यावेत.
रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका तात्काळ जाहीर कराव्यात.
गावाचा कारभार गावकऱ्यांच्या हातीच असावा.
या मागणीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, शासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.



