दहा वर्षांहून अधिक काळ संचालक असलेले अपात्र ठरणार; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सहकारी बँकिंग क्षेत्रात सलग दहा वर्षांपासून संचालक अथवा अध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घेतला आहे. यासंदर्भात दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सहकार विभागाला अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे.
या निर्णयानुसार येणाऱ्या काळात कोणत्याही सहकारी संस्थेत सलग दहा वर्षे संचालक किंवा अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीस पुन्हा (डबल) निवडणुकीत सहभागी होता येणार नाही. या नियमामुळे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था, कर्मचारी सहकारी पतसंस्था तसेच इतर सर्व सहकारी बँक व पतसंस्थांवर हा नियम लागू राहणार आहे.
या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील अनेक मुरब्बी व दीर्घकाळ सत्तेत असलेले पुढारी अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून, सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः बँकिंग व पतसंस्था क्षेत्रातील राजकारणावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
हे पत्र जिल्हा निवडणूक प्राधिकरण तसेच तालुका निवडणूक प्राधिकरण कार्यालयात प्राप्त झाल्याने सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ सुरू झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.



