आमदारकीची प्रतिष्ठा पणाला; उच्चविद्याविभूषित लोकप्रतिनिधी ‘किंगमेकर’च्या दावणीला? स्वतःच्या अधिकारांची जाणीव हरवलेले आमदार; ‘रबर स्टॅम्प’ कारभारामुळे मतदारांत संताप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
राजकारणात पद, प्रतिष्ठा आणि विश्वास हे जनतेच्या कौलावर उभे असतात. मात्र उमरखेड विधानसभा मतदारसंघात सध्या दिसणारे चित्र लोकशाहीच्या आत्म्यालाच प्रश्न विचारणारे ठरत आहे. मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे उच्चविद्याविभूषित असतानाही, त्यांचे घटनात्मक अधिकार एका ‘स्वयंघोषित किंगमेकर’च्या दावणीला बांधले गेल्याची चर्चा आता केवळ बंद खोलीत न राहता उघडपणे जनतेत सुरू झाली आहे.
लोकशाही व्यवस्थेत आमदार हे मतदारसंघाचे सर्वोच्च प्रतिनिधी असतात. शासकीय कार्यक्रम, भूमिपूजन, उद्घाटन किंवा अधिकृत फलकांवर आमदारांचे नाव व स्थान अग्रक्रमाने असणे हा शिष्टाचार आहे. परंतु उमरखेडमध्ये हा प्रोटोकॉल सर्रास पायदळी तुडवला जात असल्याचे चित्र आहे. विकासकामांच्या फलकांवर आमदारांपेक्षा त्या तथाकथित ‘किंगमेकर’चा फोटो आणि नाव ठळकपणे झळकत असल्याने, “खरा लोकप्रतिनिधी नक्की कोण?” असा सवाल मतदार विचारू लागले आहेत.
विद्यमान आमदारांकडून अभ्यासू भूमिका, स्वतंत्र निर्णयक्षमता आणि ठाम नेतृत्वाची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात ते या स्वयंभू किंगमेकरच्या हातातील बाहुले बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आमदारांच्या दुर्बळ भूमिकेचा पुरेपूर फायदा घेत संबंधित नेता स्वतःची राजकीय ताकद वाढवताना दिसत असून, आमदारांचे अधिकार आणि प्रतिष्ठा यांचा वापर स्वतःच्या हितासाठी करत असल्याची टीका होत आहे. अशी भूमिका आमदारांच्या शिक्षणालाही आणि त्यांच्या पदालाही न शोभणारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
नगरपरिषद निकालातून जनतेचा इशारा
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत जनतेने या एकाधिकारशाही कारभाराला सणसणीत चपराक दिली आहे. ज्या नेत्याच्या इशाऱ्याशिवाय आमदार निर्णय घेत नाहीत, त्या नेत्याला स्वतःच्या कुटुंबातील उमेदवारालाही निवडून आणता आले नाही, ही बाब बोलकी आहे. यातून जनतेचा स्पष्ट संदेश आहे की, दुहेरी सत्ता, पडद्यामागील नियंत्रण आणि बोगस वर्चस्व आता सहन केले जाणार नाही.
आत्मपरीक्षणाची वेळ
आमदार हे जनतेचे प्रतिनिधी असतात, कोणाच्याही खासगी सेवेत राहण्यासाठी नव्हे. पद आणि अधिकार हे लोककल्याणासाठी असतात, ते दुसऱ्याच्या चरणी अर्पण करण्यासाठी नाहीत. आमदारांनी वेळीच आपल्या कर्तव्याची, अधिकारांची आणि जबाबदारीची जाणीव ठेवून स्वतंत्रपणे निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, आगामी निवडणुकांमध्ये जनतेचा रोष त्यांच्यावरही कोसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मतदार उघडपणे देऊ लागले आहेत.



