अखेर लाल झेंडाच जिंकला! बँक अधिकारी नमले, निवडणुकीच्या तोंडावर लाल बावटा चमकला माकपाच्या एकदिवसीय धरणे आंदोलनाला ऐतिहासिक यश उद्यापासून थकीत शेतकऱ्यांचे विड्रॉल सुरू होणार

महागाव | विशेष प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अखेर लाल झेंड्याच्या ताकदीपुढे बँक अधिकाऱ्यांना नमते घ्यावे लागले. निवडणुकीच्या तोंडावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) च्या नेतृत्वाखाली झालेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनाने बँक प्रशासनाला झुकवले आणि थकीत शेतकऱ्यांच्या खात्यांवरील अन्यायकारक कर्जकपातीला ब्रेक लावला.
आज मंगळवार, दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत, माकपाच्या आवाहनानुसार हातात लाल झेंडे घेऊन, बँकांच्या जाचाला कंटाळलेले शेकडो शेतकरी – पुरुष व महिला – तहसील कार्यालयावर धडकले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. डी. बी. नाईक व कॉ. देविदास मोहकर या जिवलग जोडीने केले.
डफाच्या तालावर नृत्य, “इन्कलाब जिंदाबाद”, “किसान सभेचा विजय असो” या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तहसील प्रशासनाने लेखी नोटीस देऊनही बँक अधिकारी वेळेत न आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.
तहसीलदार अभय मस्के व कॉ. डी. बी. नाईक यांच्यात फोनवर चर्चा झाली. प्रशासनाने “उद्या बैठक लावू” अशी भूमिका घेतली; मात्र आंदोलकांनी “उद्या नाही, आजच निर्णय” अशी ठाम भूमिका घेतल्याने पोलीस प्रशासन, API कायंदे, नायब तहसीलदार पराते यांची धावपळ उडाली.
नायब तहसीलदार पराते यांनी तातडीने सर्व बँक मॅनेजरना बोलावून कॅबिनमध्ये बैठक घेतली. बैठकीत एसबीआय वगळता इतर बँक अधिकाऱ्यांनी “आम्हाला स्पष्ट आदेश नाहीत, वेळ द्या” अशी भूमिका घेतली. त्यावर आंदोलकांचे शिष्टमंडळ बैठकीत सहभागी झाले.
कॉ. डी. बी. नाईक यांनी बँक अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला —
26 व 28 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयांनुसार कर्जवसुलीला स्थगिती व पुनर्गठनाचे आदेश असताना थकीत खात्यांतून विड्रॉल का अडवता? सक्तीने कर्जकपात केल्यास शेतकरी कर्जमाफीला मुकणार की नाही? मुख्यमंत्री स्तरावर पुन्हा SLBC लावणार का? 10 ऑक्टोबरपासून वरिष्ठांना भेटलेच नाहीत का?
या ठोस प्रश्नांनी बँक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि संपूर्ण वातावरणच बदलून गेले.
कॉ. नाईक यांनी स्पष्ट अट घातली —
“उद्यापासून थकीत शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम अडवली जाणार नाही, हे आंदोलकांसमोर जाहीर करा; तेव्हाच धरणे आंदोलन मागे घेऊ.”
बाहेर डफड्यांचा निनाद आणि आत कॅबिनमध्ये शब्दांचा संघर्ष — असे या जिगरबाज आंदोलनाचे चित्र पाहायला मिळाले.
अखेर एसबीआयचे रोशन शिरभाते, युनियन बँक, महागाव बँकेचे विनयराज टेनकाळे, किरण सावळे, सेंट्रल बँक (फुलसावंगी) चे नागदीवे, सवना शाखेचे सूरज खाडे यांच्या वतीने विनयराज टेनकाळे व रोशन शिरभाते यांनी आंदोलकांसमोर जाहीर केले —
👉 “उद्यापासून थकीत शेतकऱ्यांची कोणतीही कर्जकपात न करता विड्रॉल दिले जातील.”
ही घोषणा होताच “शेतकरी एकता जिंदाबाद” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनामुळे फक्त महागाव तालुक्याचा प्रश्न सुटला नाही, तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात माकपाच्या आंदोलनाची धग पोहोचणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता महागावचे उदाहरण देऊन जिल्ह्यातील गरीब, थकीत शेतकरी लाभ घेऊ शकणार आहेत.
यावेळी नायब तहसीलदार पराते यांनी अतिवृष्टी, अतिक्रमण, कायम प्रस्ताव, राहूर, साधूनगर, वडद, चिंचोलीसह तालुक्यातील सर्व प्रश्नांवर उद्या तहसीलदार मस्के यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता कार्यवाही केली जाईल, असेही जाहीर केले.
हे ऐतिहासिक आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ. पांडुरंग मुडे, गणेश तिघलवाड, दिलीप भिसे, तारा चव्हाण, शिवा गोपनवाड, शादत खान, मारोती हुलकाने, रमेश जाधव, प्रभाकर पाटील, मुरली पवार, अनिल राऊत, लक्ष्मण खुपसरे, शाम चंदू राठोड, गजानन वानोळे, दत्ता धुमारे, मनोज जाधव, प्रताप राठोड, अशोक महाराज, बाळू रणमले, प्रकाश ढगे, अमोल राठोड, सोनू पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सक्रिय सहभागी होते.



