उमरखेड नगरपालिका निवडणुकीत चुरस; विकासाचा अभाव, अतिक्रमण-खड्डे व घाणीच्या समस्यांवरून मतदारांचा रोष

प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड नगरपालिका निवडणुका आता रंगात येऊ लागल्या असून यावेळची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. मागील १५ वर्षांत शहराच्या विकासाकडे स्पष्ट दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांमध्ये असून, रस्त्यांवरील अतिक्रमण, खड्ड्यांनी भरलेले मुख्य मार्ग, घाणीचे साम्राज्य, वार्डात नसलेली साफसफाई आणि घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचार यामुळे नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे.
भारतीय जनता पार्टीकडे तीनवेळा आमदारकी असूनही शहरात कोणताही ठोस विकास झालेला नाही, अशी टीका नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे यावेळेस मतदार उमेदवार निवडताना “काम आणि प्रामाणिकपणा” या निकषाला प्राधान्य देताना दिसत आहेत.
नगराध्यक्षपदासाठी महिलांचे आरक्षण – उमेदवारीचा तुफान राजकीय खेळ
नगराध्यक्षपद ओपन महिला राखीव घोषित होताच उमरखेडमध्ये उमेदवारींची लगबग सुरू झाली आहे.
भाजपकडून सौ. निधीताई नितीन भुतडा पुढे
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सौ. निधीताई नितीन भुतडा यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून त्यांनी नामांकन दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
महाविकास आघाडी – सौ. तेजश्री संतोष जैन चर्चेत
काँग्रेस–मविआतर्फे सौ. तेजश्री संतोष जैन यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांची उमेदवारी निश्चिती लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना – सौ. शारदाताई संजय जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे सौ. शारदाताई जाधव यांचे नाव पुढे आले आहे.
एमआयएमकडून मुस्लिम महिला उमेदवार?
एमआयएमकडून नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम महिला उमेदवार उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे काँग्रेस-मविआच्या मतांवर सरळ परिणाम होणार असल्याचे राजकीय समीकरणे सूचित करतात.
भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीचा परिणाम?
भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत युती झाल्याची माहिती नेते पोफाळी आणि तालुका अध्यक्षांकडून देण्यात आली आहे.
या युतीमुळे रिंगणात मोठे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून राष्ट्रवादीचे उमेदवारही लवकरच जाहीर होणार आहेत. काँग्रेसला धक्का – आंदोलन पाटील पवारांना उमेदवारी नाकारली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अडथळा ठरणारा सारडा पेट्रोल पंप हटवण्यासाठी संघर्ष करणारे आंदोलन पाटील पवार यांनी काँग्रेसकडे प्रभाग ४ मधून उमेदवारी मागितली होती.
मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. याचा थेट फटका काँग्रेसला बसू शकतो.
सेक्युलर अपक्षांची तिसरी आघाडी शक्य
शहरातील काही समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते तिसरी सेक्युलर अपक्ष आघाडी निर्माण करण्यासाठी हालचाली करत आहेत.
शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या निवडणुकीत जनतेकडून प्रतिसाद मिळू शकतो.
एमआयएम विरुद्ध इतर – निवडणूक रंगतदार
जातीय आणि सामाजिक समीकरणे यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणार असून “एमआयएम विरुद्ध इतर पक्ष” असे थेट समीकरण अनेक वार्डात स्पष्ट होते आहे.
शहरातील समस्या – मतदार ‘बदल’ शोधत आहेत
उमरखेडमधील प्रत्येक वार्डात काही ना काही गंभीर समस्या आहेत—
खड्ड्यांनी भरलेले मुख्य रस्ते
वार्डात साफसफाईचा ढिसाळ कारभार
नाल्यांची नियमित सफाई नाही
लेआउट अतिक्रमण
पावसाळ्यात वार्डात तयार झालेल्या पाण्याच्या तळी
घनकचरा व्यवस्थापनात अनियमितता
पेवर ब्लॉक, रस्ते, पाण्याची कामे ठप्प
काही नेत्यांनी फक्त फोटोसेशन करून प्रसिद्धी घेतली, पण प्रत्यक्ष समस्या कायमच राहिल्याने लोक आता सतर्क झाले आहेत.
अंतिम चित्र — उमेदवारांची यादी जाहीर होताच स्पष्ट होणार
सर्व पक्षांचे आणि अपक्षांचे फॉर्म निश्चित झाल्यानंतरच कोणत्या वार्डात कोण प्रभावी उमेदवार ठरणार याचे चित्र स्पष्ट होईल.
उमरखेडमध्ये यावेळेस पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख नेतृत्व निवडण्याच्या दिशेने जनमत झुकलेले दिसत आहे.



