महागाव तालुक्यातील विकासकामांमध्ये कोलमडलेली पारदर्शकता — ब्लॅकलिस्ट ठेकेदाराला काम, अधिकाऱ्यांचे संगनमत?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
तालुक्यातील विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता, भ्रष्टाचार आणि संगनमताचे धक्कादायक प्रकार सतत समोर येत आहेत. महागाव तालुक्यात ज्यांना पूर्वी काम न केल्यामुळे ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते, अशाच ठेकेदारांना पुन्हा काम देण्याचा प्रकार उघड झाल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कारभारावर मोठमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायतींमध्ये विविध कामांमध्ये या ठेकेदाराने ग्रामसेवकांच्या संगनमताने काम पूर्ण न करता बिलांची उचल केली आहे.
मुडाणा, वाडी, घाणमुख, लेवा, वाकोडी आदी गावांमध्ये झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
विशेष म्हणजे —
विस्तार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशी करून 20–25 गावांचे तपशीलवार अहवाल द्यायचे असताना, हे अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे आजपर्यंत सादरच झाले नाहीत. त्यामुळे विस्तार अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय गावकऱ्यांमध्ये अधिक बळावत आहे.
१५ वा वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या मोजमाप पुस्तकांमध्ये (Measurement Book) मोठे फरक आढळले आहेत. कामे प्रत्यक्षात अर्धवट किंवा न झालेली असताना पुस्तकांत मात्र पूर्ण दाखवून मोठ्या रकमेची बिलं काढल्याचे आरोप आहेत.
माळवाजत, घाणमुख येथील चौकशी अहवाल ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार मागूनही अहवाल दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे चौकशी अहवाल जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यात ठेकेदाराला उघडपणे संरक्षण मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचे निधी खर्च होतात. परंतु या कामांना कोणाचे पाठबळ आहे? ब्लॅकलिस्ट ठेकेदारालाच वारंवार कामे कशी मिळतात? चौकशी अहवाल दडपले जातात तरी कारवाई का नाही?
अशा अनेक गंभीर प्रश्नांनी महागाव तालुक्यातील नागरिक संतप्त असून पारदर्शक चौकशीची मागणी जोर धरत आहे.



