नगराध्यक्षांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर भडीमार; दारू परवानगी प्रक्रियेवरून वाद चिघळला

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीत दारू परवानगी प्रक्रियेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नगराध्यक्ष रंजना दीपक आडे यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर (सीईओ) टीकेची झोड उठवली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या घडामोडींवर त्यांनी ताशेरे ओढत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नगरपंचायत हद्दीत दोन दारू परवानग्या (एन ओ सी) देण्यात आल्या. त्यापैकी एका दारू दुकानाविरोधात नागरिकांनी ठाम भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र १६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मतदानावेळी मतपेटीत सापडलेल्या काही चिठ्ठ्यांमुळे वादाला तोंड फुटले. या चिठ्ठ्यांवर संबंधित वाईन बारला विरोध नसल्याचे लिहिलेले होते. त्यामुळे देशी दारू दुकानाला अप्रत्यक्षपणे पाठबळ मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नगराध्यक्ष रंजना आडे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत, “नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेली प्रक्रिया पारदर्शक होती का?” असा सवाल उपस्थित केला. त्यांनी स्थानिक प्रशासनावर अप्रत्यक्षरित्या टीका करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात राजकीय पडसादही उमटताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर आमदार वानखेडे तसेच माजी आमदार ससाने नितीन भुतडा यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत असून, या संपूर्ण घडामोडीत राजकीय नेत्यांची प्रतिमा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, संबंधित वार्डातील नागरिकांनी देशी दारूचे दुकान बंद न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, यांच्याच काळात दोन नवीन दारू दुकानांना परवानगी मिळाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. संबंधित सर्व नगरसेवकांवरही नागरिकांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली असून, याचा परिणाम आगामी राजकारणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, कायदेशीर चौकटीत राबविण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने “सत्ता कुणाची आणि कारभार कुठे चालला?” असा सवाल आता महागावकरांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.



