सेवानगर कासाळबेळ येथे रेती उत्खनन प्रकरणात बकऱ्याच्या मेजवानीची चर्चा; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
सेवानगर कासाळबेळ (ता. महागाव) परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा व विक्री सुरू असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. अशातच दहा दिवसांपूर्वी कासाळबेळ येथे झालेल्या बकऱ्याच्या मेजवानीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या मेजवानीचे आयोजन कथितरित्या रेती व्यवसायाशी संबंधित व्यक्तीकडून करण्यात आल्याची चर्चा असून, या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी तसेच काही पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते, अशी चर्चा गावात रंगत आहे. अवैध रेती उपशावर कारवाई होऊ नये, यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
कासाळबेळ परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र यावर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित मेजवानीनंतर या प्रकरणाची चर्चा अधिक तीव्र झाली असून, संपूर्ण परिसरात याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, तसेच शासकीय अधिकारी–कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. पैनगंगा नदीचे पर्यावरणीय नुकसान थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



