अल्पवयीन मुलगी बेपत्ता प्रकरणाचा छडा; महागाव पोलिसांची तत्पर कारवाई

कारंजा घाडगे येथून पीडितेसह आरोपी ताब्यात; फिर्यादीकडून पोलिसांचे कौतुक
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात महागाव पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक तपास आणि शोधमोहीमेच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलगी व संबंधित आरोपीला कारंजा घाडगे (जि. वर्धा) येथून ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महागाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १४३/२०२६ अन्वये कलम १३७(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी कविता गंगाधर गिरी यांच्या अल्पवयीन मुलगी कारंजा घाडगे (जि. वर्धा) येथून महागाव येथे तिच्या मावशीकडे आली होती. मात्र, ४ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ती कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती.
तपासादरम्यान आरोपी उज्वल शंकरराव बारंगे (वय २४, रा. आगरगाव, ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महागाव पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड व तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबविली.
या कारवाईत पथकप्रमुख पीएसआय किशोर मुरकुटे, जमादार एडकर तसेच एलपीसी सुनीता शिरुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पथकाने १५ जून २०२६ रोजी कारंजा घाडगे येथून अल्पवयीन मुलगी व आरोपीला ताब्यात घेऊन महागाव पोलीस ठाण्यात हजर केले.
प्रकरणाचा यशस्वी छडा लागल्याने फिर्यादी व कुटुंबीयांनी महागाव पोलिसांचे आभार मानत कौतुक केले आहे. दरम्यान, महागाव पोलीस ठाण्यात प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्यात येत असून विविध प्रकरणांचा छडा लावण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.



