महागाव तालुक्यात वाहनचोरांचा हैदोस; महिंद्रा पिकअपसह लाखोंची वाहने चोरी, पोलिसांपुढे आव्हान

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अलीकडच्या काळात वाहनचोरीच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले असून चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हिवरा, मुडाणा व कलगाव परिसरातून दोन महिंद्रा पिकअपसह लाखो रुपयांची वाहने चोरीला गेली असून अद्यापपर्यंत पोलिसांना चोरांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
माहितीनुसार महागाव तालुक्यातील विविध गावांमधून सुमारे 30 लाख रुपये किमतीच्या दोन महिंद्रा पिकअप वाहनांची चोरी झाली आहे. याशिवाय कलगाव येथून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे मोठे मळ यंत्र (कृषी यंत्र) देखील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या सर्व घटनांबाबत महागाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असले तरी चोरी गेलेल्या वाहनांचा अद्याप शोध लागलेला नाही.
या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. अनेकांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज काढून व मोठ्या कष्टाने ही वाहने खरेदी केली होती. मात्र अल्पावधीतच वाहने चोरीला गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
चोरीच्या घटनांनंतर वाहनमालकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन चोरी गेलेल्या वाहनांचा तातडीने शोध लावण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात स्थानिक पोलीस आणि एलसीबी पथकाने विशेष मोहीम राबवून चोरट्यांना जेरबंद करावे व चोरीला गेलेली वाहने जप्त करून वाहनधारकांना परत द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असतानाही चोरीचा तपास पुढे का सरकत नाही, असा सवाल तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनमालकांनी विशेष पोलीस महासंचालक व गृह विभागाकडेही केली आहे.
महागाव तालुक्यात सलग घडणाऱ्या या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा माग काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.



