हिवरी ग्रामपंचायतीत ग्रामसभेदरम्यान दोन गटांत हाणामारी सरपंच जखमी; रोजगार सेवकाच्या मुद्द्यावरून वाद चिघळला

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील हिवरी ग्रामपंचायतीत ग्रामसभेदरम्यान दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत सरपंचासह काही जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकाला पदावरून हटविण्याच्या मागणीसंदर्भात सकाळी दहा वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामपंचायत पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
रोजगार सेवकाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत ठराव मांडण्यात येताच दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती तणावपूर्ण बनत पोलिसांच्या उपस्थितीतच तुंबळ हाणामारी झाली. या गोंधळात सरपंचांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती आहे.
घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे धाव घेतल्याचे समजते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



