अतिवृष्टीचा तडाखा: महागाव तालुक्यात विहिरी ढासळल्या, पंचनामे खोळंबले शेतकरी भरडले, प्रशासन रामभरोशावर

महागाव —प्रतिनिधी संजय नागरगोजे
तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी कोसळून मोठे नुकसान झाले आहे. नेहरूनगर येथील गट क्रमांक 31 मधील वडिलोपार्जित विहीर 27 सप्टेंबर रोजी आलेल्या पुराच्या पाण्याने पूर्णपणे ढासळली. सदर विहिरीबाबत शेतकरी गजानन प्रकाश कदम यांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना लेखी अर्ज देऊन पंचनामा करून शासनाचा लाभ देण्याची मागणी केली.
परंतु दुर्दैवाने, महागाव तालुक्यात 25 ते 30 शेतकऱ्यांच्या विहिरी ढासळूनही एकाही प्रकरणात आजपर्यंत शासकीय मदत मिळाली नाही.
पंचनामे न होता शेतकऱ्यांचे हाल
अतिवृष्टीच्या काळात विहिरी, पिके व इतर नुकसानीसाठी संयुक्त पंचनामा करणे बंधनकारक असताना महागाव तालुक्यातील बांधकाम विभागातील जेई, तहसील कार्यालय आणि गटविकास कार्यालय यांच्यात पूर्णत: समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.
तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात त्यांची हालचाल शून्य असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आत्महत्याग्रस्त तालुका… तरीही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
महागाव तालुका हा सतत शेतकरी आत्महत्यांनी ग्रासलेला आहे. अशा स्थितीत ज्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे विहिरीचे नुकसान झाले आहे, त्यांना शासनाने दिलासा देण्याऐवजी प्रशासनाने कानाडोळा केल्याने शेतकरी अधिकच निराश झाले आहेत.
विशेष म्हणजे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वारंवार अर्ज देऊनही पंचनामे करण्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष जागेवर न गेल्याचे अनेक आरोप होत आहेत.
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह
आमदार-खासदारांकडून या गंभीर प्रश्नाकडे कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तालुक्यातील शेतकरी अडचणीत असताना जनप्रतिनिधी गप्प का? असा सवाल ग्रामस्तरावर उपस्थित केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी
शेतकऱ्यांची आर्थिक, मानसिक अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे विहिरी ढासळलेल्या सर्व शेतकऱ्यांचे संयुक्त पंचनामे तात्काळ करून शासनाचा अनुदान देण्यात यावे, अशी जोरदार मागणी तालुक्यातून होत आहे.



