शाखा व्यवस्थापक किरण पाटील यांचा दलालांना दणका शाखा व्यवस्थापक किरण पाटील यांचा दलालांना दणका “बँकेच्या कामात अवैध हस्तक्षेप अथवा दबाव सहन करणार नाही”

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यातील काळे दौ. खान सर्कलमधील युनियन बँक शाखेत कर्ज प्रकरणांमध्ये दलालांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा असतानाच, आता शाखा व्यवस्थापक किरण पाटील यांनी दलालगिरी व दबावाला आळा घालण्याची भूमिका घेतल्याने बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काही वर्षांपासून काही दलाल शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठन अथवा कर्ज नूतनीकरणाच्या प्रक्रियेत मध्यस्थी करत असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम भरून कर्जप्रकरण पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडून अतिरिक्त रक्कम अथवा कमिशन घेतले जात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांऐवजी मध्यस्थांना होत असल्याची भावना काही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
सध्या शेती कर्ज पुनर्गठन आणि कर्जमाफीच्या प्रक्रियेमुळे बँकेत शेतकरी तसेच इतर खातेदारांची मोठी गर्दी आहे. बँकेचे कार्यक्षेत्र माळ पठारावरील सुमारे २९ गावांशी जोडलेले असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी वर्दळ शाखेत असते. अशा परिस्थितीत काही दलालांकडून ठरावीक कर्जप्रकरणे प्राधान्याने करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
“आज खात्यात पैसे भरले की उद्याच कर्ज मंजूर करून रक्कम मिळाली पाहिजे,” असा आग्रह काही मध्यस्थांकडून धरला जात असल्याने नियमित प्रक्रियेत काम करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप व दबाव आणला जात असल्याची चर्चा असून, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते.
“बँक सर्व खातेदारांची; दलालांची किंवा नेत्यांची नाही”
या पार्श्वभूमीवर शाखा व्यवस्थापक किरण पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “बँक ही सर्व खातेदारांची आहे. दलालांची किंवा कोणत्याही नेत्यांची नाही. बँकेच्या नियमाप्रमाणे सर्वांची कामे केली जातील. दलालगिरी आणि दडपशाही चालणार नाही. बँकेच्या कामात अवैध हस्तक्षेप अथवा बँक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.”
शाखा व्यवस्थापकांच्या या भूमिकेमुळे बँकेतील कामकाज पारदर्शक पद्धतीने होऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना समान संधी मिळणार का, याकडे आता परिसरातील खातेदारांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732



