कोरड्या दुष्काळात शेतकरी होरपळला; हेक्टरी एक लाखांची मदत द्या यवतमाळ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी नेते मनीष जाधव यांची मागणी
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद, दि. ७ सप्टेंबर २०२६ : पावसाने तब्बल २८ दिवसांपासून दडी मारल्याने यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस यासह विविध पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत उभी पिके उद्ध्वस्त होत असून, यवतमाळ जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी मनीष जाधव यांनी पुसद तालुक्यातील काटखेडा गावाला भेट देऊन शेतशिवारातील पिकांची पाहणी केली. यावेळी पावसाअभावी करपलेली सोयाबीन व कापसाची पिके पाहून शेतकऱ्यांची व्यथा समोर आली.
यावेळी काटखेडा येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी पांडुरंग रायसिंग आडे यांनी शासनाकडे आर्त हाक देत, “पाऊस न झाल्याने आमची पिकेच करपली नाहीत, तर आमच्या स्वप्नांचीही राखरांगोळी झाली आहे. घेतलेले कर्ज फेडायचे कसे आणि जगायचे कसे? आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे,” अशी व्यथा मांडली.
गतवर्षी अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाचा सामना केल्यानंतर यंदाच्या खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे अनेक भागांतील उभी पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
तहसीलदारांना शेतशिवारातून दूरध्वनीवरून मागणी
शेतशिवारातूनच पुसदच्या तहसीलदार रेखा विणा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकरी नेते मनीष जाधव यांनी पिकांच्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. NDRF व SDRFच्या निकषांनुसार कोरड्या दुष्काळाची दखल घेऊन तातडीने मदत जाहीर करावी, तसेच हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत पंचनाम्याच्या अटीत न अडकवता सरसकट द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर तहसीलदारांनी नुकसान झालेल्या पिकांच्या परिस्थितीबाबत तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना माहिती कळविण्याचे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
पिकांचे मोका पंचनामे करून विम्याची अंमलबजावणी करा
शेतपातळीवर प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची पाहणी करून मोका पंचनामे करण्यात यावेत आणि पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही जाधव यांनी केली. नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची हमी देणाऱ्या पीक विमा योजनेचा लाभ संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“एकीकडे कृषी विभागातील कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनात आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी ना नेत्यांना वेळ आहे ना प्रशासनाला. मग शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक व मानसिक आधार न मिळाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शासनाने संवेदनशीलतेने परिस्थितीची दखल घेऊन दुष्काळी उपाययोजना, कर्जमाफी/कर्जसवलत, पीक नुकसानभरपाई आणि पीक विम्याचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
शासनाने मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.
यावेळी पांडुरंग आडे, विकास राठोड, संतोष जाधव, चांगदेव आडे, किसन रेवा राठोड, संतोष आडे, श्याम साखरे, विश्वदीप झोडगे, सुदर्शन झोडगे, अंबादास जाधव, विजय जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



