महागाव नगरपंचायतीत पुन्हा ‘रेकॉर्ड’ गायब! स्थायी समितीचे महत्त्वाचे बुक कार्यालयातून गायब; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीच्या कारभारातील कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या २२ फाईल चोरीचे प्रकरण ताजे असतानाच आता स्थायी समितीचे महत्त्वाचे बुकच कार्यालयातून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नगरपंचायतीत नेमके रेकॉर्ड सुरक्षित तरी कुठे आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नगरपंचायतीतील महत्त्वाचे रेकॉर्ड वारंवार गायब होण्याच्या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच संशयाची सुई वळली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेच्या फाईल चोरीचे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर आता स्थायी समितीचे बुक गायब झाल्याने ही केवळ निष्काळजीपणा आहे की रेकॉर्ड गायब करण्यामागे काही वेगळे कारण आहे? याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सीसीटीव्ही तपासा, जबाबदार कोण ते स्पष्ट करा!
नगरपंचायतीच्या अधिकृत नोंदवही व महत्त्वाच्या रेकॉर्डची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे. संबंधित कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, बुक ताब्यात घेण्याची व परत करण्याची नोंद तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब तपासल्यास रेकॉर्ड नेमके कुठे गेले, याचा छडा लागू शकतो.
विशेष म्हणजे, स्थायी समितीच्या बैठका, ठराव आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वाची माहिती या बुकमध्ये नोंदवली जात असल्याने त्याचे गायब होणे ही साधी बाब नसल्याचे बोलले जात आहे.
‘रेकॉर्ड गायब’ होण्यामागे कोणाचा हात?
नगरपंचायतीतील महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र एकापाठोपाठ एक रेकॉर्ड गायब होण्याच्या घटना घडत असतील, तर रेकॉर्ड रूमपासून कार्यालयीन यंत्रणेपर्यंत नेमकी कुठे चूक होत आहे? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची केवळ अंतर्गत चौकशी न करता स्वतंत्रपणे चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
महत्त्वाचे रेकॉर्ड गायब होतात आणि प्रशासनाला त्याची खबरही लागत नाही, तर उद्या कोणता रेकॉर्ड गायब होईल? असा सवाल आता महागावकर विचारत आहेत.



