पुण्यात पत्रकारावर गुन्हा दाखल केल्याने पत्रकार संरक्षण समिती आक्रमक

मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा तातडीने मागे घेण्याची मागणी
पुणे : पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (COEP) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात पडताळणी न करता पत्रकार मंदार गोंजारी यांचे नाव जोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित पत्रकाराचे नाव गुन्ह्यातून तातडीने वगळावे, अशी मागणी पत्रकार संरक्षण समिती, पुणे शहरच्या वतीने करण्यात आली आहे.
जनहिताच्या बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांवर अशा पद्धतीने गुन्हे दाखल होणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे, अशी भूमिका पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या कारवाईमुळे राज्यातील पत्रकार संघटनांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे समितीने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण समिती, पुणे शहरच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील तसेच पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा केली.
पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती पुणे शहरचे अध्यक्ष सुनील शिरसाट, शहर सचिव धनराज खंडाळे, ज्येष्ठ पत्रकार व संपादक संतोष सागवेकर, स्वप्निल कोठावडे, महिला प्रतिनिधी मंजुषा आवळकंठे यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. निवेदनावर पदाधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत.
“पत्रकारिता ही जनहिताचा आवाज बुलंद करण्यासाठी आहे. पत्रकाराने केलेल्या बातमीची योग्य पडताळणी न करता त्याचे नाव गुन्ह्यात जोडणे ही गंभीर बाब असून, पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण झाले पाहिजे,” अशी भूमिका समितीच्या वतीने मांडण्यात आली.



