शक्तिपीठ’ महामार्गाला शेतकऱ्यांचा ‘ब्रेक’ भूसंपादनाला तीव्र विरोध; वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी शेतजमिनी संपादनाच्या प्रक्रियेला महागाव तालुक्यातील हिवरा येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शासनाकडून येणाऱ्या मोबदल्यापेक्षा जमिनीला मिळणारा बाजारभाव व भविष्यातील संभाव्य मूल्य लक्षात घेऊन योग्य व वाढीव मोबदला मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून, प्रकरणाची गंभीर दखल घेत खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेलाही विरोध केला आहे.
शक्तिपीठ महामार्गासाठी महागाव व उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. या परिसरातून यापूर्वी नागपूर महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा नव्याने जमीन संपादन करण्याची आवश्यकता काय, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
“महामार्गासाठी जमीन घ्यायचीच असेल तर शेतकऱ्यांना योग्य व वाढीव मोबदला द्यावा. जमीन संपादन करताना शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या भवितव्याचा विचार करावा,” अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
दरम्यान, अॅड. अंजली राजत यांनी शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल केल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. न्यायालयीन लढाईमुळे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला महागाव परिसरात कायदेशीर अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.



