विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड नको..! ; माजी मुख्यमंत्र्यांनी शिक्षण घेतलेले सावित्रीबाई फुले शाळा क्र. २ मध्ये सुरक्षा जाळी व मच्छर फवारणीची तातडीने व्यवस्था करा ; यादव मारोती हाटे यांच्यासह पालकांचे प्रशासनाला निवेदन…

पुसद :- “पुसद नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शाळेतील खिडक्यांना तातडीने सुरक्षा जाळी बसविण्यासह संपूर्ण परिसरात मच्छर प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यादव मारोती हाटे यांच्यासह पालकांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या या ऐतिहासिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना होणे गरजेचे आहे. सध्या मलेरिया व डेंग्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळेच्या परिसरात मच्छर फवारणी करणे अत्यावश्यक आहे.
त्याचबरोबर खिडक्यांना सुरक्षा जाळी नसल्याने डासांसह विविध कीटक व विषारी प्राण्यांचा शाळेच्या वर्गांमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. मन्यारसारख्या विषारी सापांचा तसेच इतर विषारी प्राण्यांचा परिसरात वावर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘विद्यार्थ्यांची सुरक्षितता प्रथम’ या भूमिकेतून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे.
या मागणीसाठी यादव मारोती हाटे व इतर पालकांनी पुसद नगर परिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, प्रशासन अधिकारी तसेच पुसद नगर परिषदेचे शिक्षण सभापती विठ्ठल खडसे यांना निवेदन सादर केले.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन सुरक्षा जाळी बसविणे, मच्छर फवारणी करणे आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.



