महागाव शहरात रस्त्यालगत जीवघेणा खड्डा; नगरपंचायतीचे दुर्लक्ष? नगराध्यक्षांच्या प्रभाग क्रमांक २ मधील प्रकार; चारचाकी वाहनही खड्ड्यात जाण्याची शक्यता

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव–पुसद मुख्य मार्गावर महागाव शहरातील किराणा दुकानासमोर, नेवार यांच्या घरासमोरील रस्त्यालगत मोठा खड्डा पडला आहे. व्यापारी व नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी हा खड्डा असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे हा परिसर प्रभाग क्रमांक २ मध्ये येत असून, नगराध्यक्षांच्या प्रभागातच रस्त्यालगत एवढा मोठा खड्डा निर्माण झाल्याने नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या खड्ड्याची खोली व आकार एवढा मोठा आहे की, चारचाकी वाहनाचे चाक त्यात अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यास वाहनचालकांना तो सहज लक्षात न येण्याची शक्यता असून, त्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, व्यापारी, दुचाकीस्वार व चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे संबंधित खड्ड्याची तातडीने पाहणी करून तो बुजवावा तसेच भविष्यात अशा प्रकारे रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अपघात होण्याची वाट पाहण्यापेक्षा नगरपंचायतीने तातडीने खड्डा बुजवून संभाव्य धोका टाळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



