उमरखेडमध्ये अवैध रेती वाहतुकीवर एलसीबीची धडक कारवाई विनारॉयल्टी रेती वाहतूक करणारा टिप्पर जप्त; सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध शस्त्रसाठा आणि अनधिकृत उत्खननाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई केली.
दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ईद-ए-मिलाद बंदोबस्त तसेच उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गोपनीय बातमीदाराकडून उमरखेड-धानकी मार्गावर एका टिप्परमधून विनारॉयल्टी रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत अर्धडा फाटा रोडवर सापळा रचला. यावेळी एमएच-०४-ईएल-५७५३ क्रमांकाचा टिप्पर संशयास्पदरीत्या येताना आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. पोलिसांनी टिप्परसह रेती असा सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सय्यद शाहिद सय्यद वहीद, रा. ढानकी यांच्याविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 48(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज बांडे, अमोल राठोड, तसेच पोलीस अमलदार मुन्ना आडे, संतोष घोरगे, रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे व पथकाने केली.
दरम्यान, उमरखेड-महागाव परिसरात अवैध रेती वाहतूक, अवैध दारूविक्री आणि इतर अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेषतः पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड यांच्या नेतृत्वाखालील कारवायांची परिसरात चर्चा होत आहे.



