महागावात चिल्लर दारू विक्रेत्यांकडून होलसेल विक्रीचा आरोप एलसीबीची मुडाना येथे कारवाई; बालाजी गव्हाणे दारूसाठ्यासह ताब्यात

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरातील देशी दारू विक्रेत्यांकडून तालुक्यातील खेडोपाडी मोठ्या प्रमाणात देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळला मिळाल्यानंतर पथकाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. चिल्लर विक्रीचा परवाना असतानाही होलसेल पद्धतीने दारूची विक्री केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाव तालुक्यातील विविध गावांमध्ये देशी दारूचा पुरवठा केला जात असल्याच्या संशयावरून सात दिवसापूर्वी मुडाना येथे बालाजी गव्हाणे याला देशी दारूच्या मालासह पकडून स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, धनोडा येथेही सुमारे ३० पेट्या देशी दारू स्वतःच्या वाहनातून वाहतूक करताना पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे महागाव येथून तालुक्यातील विविध गावांमध्ये देशी दारूचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच ही देशी दारू डुप्लिकेट आहे का? याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची खेळणाऱ्या विरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे. ही तपासणी दारूबंदी अधिकारी करतील का ?का देशी दारूवाल्याला
चिल्लर विक्रीचा परवाना घेऊन प्रत्यक्षात होलसेल विक्री होत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित परवानाधारकाचा परवाना नियमानुसार रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच अवैध दारू व्यवसायाचे जाळे उघड करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दारूबंदी/राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षामुळे किंवा संगनमतामुळे अवैध विक्री सुरू असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी करून दोष आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड यांच्या पथकाने या प्रकरणात कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महागाव तालुक्यात अवैध दारूविक्री तसेच इतर अवैध धंद्यांविरोधात कारवाईला वेग आल्याचे चित्र आहे.
अवैध दारूविक्रीसोबतच रेतीच्या अवैध वाहतुकीवरही कारवाई सुरू असल्याने एलसीबीच्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



