महागाव वनपरिक्षेत्रात अवैध सागवान तोडीवर कारवाई; एकाला अटक, साथीदार फरार

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव वनपरिक्षेत्रातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अवैध सागवान तोड सुरू असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाने कारवाई केली. दगडतर्फे बीड येथील कक्ष क्रमांक ४५१ मध्ये अवैध सागवान तोड प्रकरणी बळीराम रणबावळे (रा. दगडतर्फे बीड) याला २२ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणातील एक संशयित साक्षीदार फरार असल्याची माहिती आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वनकोठडी मिळावी, यासाठी विद्यमान प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, उमरखेड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध सागवान कटाई?
महागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध सागवान कटाई सुरू असल्याची चर्चा आहे. वनविभागाच्या कारवाईमुळे या अवैध व्यवसायाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, सागवानापासून दरवाजे, खिडक्या व इतर फर्निचर तयार करणाऱ्या कारागिरांकडे सागवानाचा अधिकृत पास किंवा कागदपत्रे आहेत का, याची तपासणी व चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अवैधरीत्या तोडलेल्या सागवानापासून परिसरात मोठ्या प्रमाणात फर्निचर तयार होत असल्याची माहिती असून, संबंधित फर्निचर मिस्त्री व व्यापाऱ्यांकडील सागवानाचा स्रोत तपासणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वनविभागाकडून कठोर कारवाईचे संकेत
महागाव वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर अवैध सागवान तोडीला आळा घालण्यासाठी पुढील काळातही तपासणी व कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अवैध सागवान तोडीत सहभागी असलेल्या व्यक्तींवर तसेच बेकायदेशीर सागवानाचा वापर करणाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई केली जाईल, असे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, परिसरातील अवैध सागवान तोडीचे संपूर्ण जाळे शोधून काढण्यासाठी वनविभागाने नियमित गस्त वाढवावी आणि फर्निचर व्यावसायिकांकडील सागवानाच्या साठ्याची कागदपत्रांसह तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.



