हिमायतनगर शहरात साखरेचे दर भडकले; ऐन सणासुदीच्या काळात नागरिक त्रस्त, तर पावसाच्या दडीमुळे शेतकरीही संकटात

हिमायतनगर (ता़ प्रतिनिधी शेख खय्यूम):
हिमायत नगर शहर व परिसरात सध्या सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे पावसाने मारलेल्या प्रदीर्घ दडीमुळे शेतातील उभी पिके करपू लागली आहेत. वेळेवर पाऊस न पडल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून, दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
दुसरीकडे, बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे महिन्याचे बजेट प्रभावित झाले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेची भाववाढ झाल्यामुळे खरेदी करताना नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. वाढत्या महागाईमुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे हाल होत आहेत.
त्यामुळे प्रशासनाने व संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन साखरेचे दर नियंत्रणात आणावेत आणि पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांमधून केली जात आहे.



