एमपीडीए कारवाईत रेकॉर्डवरील धोकादायक आरोपी गजानन डहाळे वर्षभरासाठी स्थानबद्ध

उमरखेड पोलिसांच्या प्रस्तावाला जिल्हा दंडाधिकाऱ्यांची मंजुरी; छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
उमरखेड : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उमरखेड पोलिसांनी सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. वारंवार गुन्हेगारी कृत्ये करून समाजाच्या शांततेला व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारा गजानन अशोक डहाळे (वय २६, रा. गोचरस्वामी वॉर्ड, उमरखेड) याच्याविरुद्ध उमरखेड पोलिसांनी तयार केलेल्या एमपीडीए प्रस्तावाला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील एक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
आगामी ईद-ए-मिलाद व गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमरखेड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच संभाव्य गुन्हेगारी घटनांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे अभिलेख तपासण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने समाजासाठी धोकादायक ठरलेल्या गजानन डहाळे याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला.
उमरखेड पोलिसांनी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अभिलेख, आवश्यक कागदपत्रे व पुरावे संकलित करून प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला. प्रस्तावाचा पाठपुरावा करून आवश्यक पुरावे व कागदपत्रे सादर केल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एमपीडीए प्रस्तावास मंजुरी दिली. मंजुरी मिळताच उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने गजानन डहाळे याला ताब्यात घेतले आणि त्याची छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांचा स्पष्ट इशारा
या कारवाईमुळे उमरखेड शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. स्वतःला ‘भाई’ किंवा ‘डॉन’ समजून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.
वारंवार गुन्हे करणाऱ्या व समाजाच्या शांततेसाठी धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध एमपीडीए, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) तसेच तडीपारीसारख्या कायदेशीर कारवाया केल्या जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धी, ‘लाईक्स’ किंवा कोणत्याही आमिषासाठी गुन्हेगारी कृत्यांकडे वळू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत उमरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार विजय पतंगे, सहायक फौजदार मधुकर पवार, पोलीस हवालदार संदिप ठाकूर, अतुल तागडे, संतोष राठोड, चंदन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संघशिल टेंभरे, विष्णू राठोड, दिगांबर गिते, निवृत्ती महाळनवर, मारोती घुगे तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार यांनी सहभाग घेतला.
उमरखेड पोलिसांच्या या कारवाईमुळे आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक संदेश मिळाला असून, गुन्हेगारीविरोधातील पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.



