महागाव शहरातील आदिवासी नागरिकांना घरकुलाचा लाभ द्या; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून शहरातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) नागरिकांना शहरी घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा आरोप करीत प्रा. शरदचंद्र डोंगरे व इतर अनुसूचित जमातीच्या घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तातडीने घरकुलाचा लाभ देण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास दिनांक ७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, महागाव नगरपंचायतीची निर्मिती झाल्यापासून शहरातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना शहरी घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. याबाबत प्रकल्प कार्यालय पुसद तसेच यवतमाळ येथे चौकशी केली असता, या योजनेसाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकाही अनुसूचित जमातीच्या नागरिकाला शहरी घरकुलाचा लाभ मिळालेला नसल्याचेही लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
लाभार्थ्यांनी यापूर्वी महागाव नगरपंचायतीकडे प्रस्ताव सादर करून प्रकल्प अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने पात्र नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ज्यांच्याकडे घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नाही, अशा पात्र नागरिकांना शासकीय जागेवर नमुना ४ देऊन शहरी घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करावा, तसेच त्यांना घरकुलासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन बांधकामाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या मागणीसाठी संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पात्र अनुसूचित जमातीच्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा; अन्यथा ७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रा. शरदचंद्र डोंगरे व इतर लाभार्थ्यांनी दिला आहे.



