Uncategorized

जल जीवन मिशनच्या कामांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा दिल्लीत; यवतमाळसह महागावकडे लक्ष

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्ह्यासह महागाव तालुक्यात जल जीवन मिशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारींचा मुद्दा आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नागेश पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यातील, विशेषतः महागाव तालुक्यातील जल जीवन मिशनच्या कामांच्या दर्जा, खर्च व प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील जल जीवन मिशनच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्र व राज्य शासनाने समन्वयाने रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठ्याचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आला.
मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे मंजूर होऊनही प्रत्यक्ष पाणीपुरवठा, पाइपलाइन, जलस्रोत व इतर सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. महागाव तालुक्यातील आमणी येथील नळ पाणीपुरवठा योजनेला शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याची अधिकृत नोंद उपलब्ध आहे. या योजनेची किंमत 80.78 लाखांवरून 83.369 लाख रुपये करण्यात आली होती.
नागेश पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या नावाखाली झालेल्या कामांची तांत्रिक तपासणी, प्रत्यक्ष स्थळपाहणी, मंजूर निधी व खर्चाची पडताळणी, कामांची गुणवत्ता तसेच लाभार्थ्यांना प्रत्यक्ष नळाद्वारे पाणी मिळते की नाही, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विशेषतः महागाव तालुक्यातील योजनांमध्ये कामे अपूर्ण असताना देयके काढली आहेत का, निकृष्ट साहित्याचा वापर झाला आहे का, अंदाजपत्रक व प्रत्यक्ष कामात तफावत आहे का आणि संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याची शासनाची नोंद आहे. त्यामुळे ‘हर घर जल’चा उद्देश कागदावर न राहता प्रत्यक्ष गावकऱ्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे, तसेच गैरव्यवहार आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
दिल्लीतील या मुद्द्यामुळे यवतमाळ आणि विशेषतः महागाव तालुक्यातील जल जीवन मिशनच्या कामांच्या चौकशीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button