Uncategorized

नाईक सूतगिरणीच्या अध्यक्षांसह २२ संचालकांना नोटीस


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : पिंपळगाव (कान्हा) येथील बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीला राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून (एनसीडीसी) सुमारे ८ कोटी ६७ लाख रुपयांच्या धनादेश अनादर प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम भरण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
एनसीडीसीच्या वतीने ३० जुलै २०२६ रोजी बजावलेल्या या नोटीसमध्ये संस्थेचे अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापकीय संचालक अशा एकूण २२ पदाधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. संस्थेच्या आधुनिकीकरण व विस्तारासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या परतफेडीशी संबंधित धनादेश अनादर झाल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणासंदर्भात यापूर्वीसुद्धा संस्थेला एक नोटीस प्राप्त झाली होती. त्यानंतर आता पुन्हा नोटीस बजावण्यात आल्याने संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, संस्थेच्या संचालक मंडळाने २८ मार्च २०२४ रोजी पुनर्रचना पॅकेजच्या अटी व शर्ती स्वीकारल्याचेही नोटीसमध्ये नमूद आहे. त्यानुसार पोस्ट डेटेड चेक एनसीडीसीकडे देण्यात आले होते. त्यातील धनादेश अनादरित झाल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष व संचालक संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सक्रिय सहभागी असून संस्थेच्या व्यवसायाच्या संचालनासाठी जबाबदार असल्याचा दावा एनसीडीसीने नोटीसमध्ये केला आहे.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी, “एनसीडीसीची नोटीस मिळाली आहे. संस्था अडचणीत आहे. ही बाब आम्ही शासनाला वारंवार कळवली आहे. शासनाने मदत केली तर संस्था पुन्हा चांगल्या पद्धतीने सुरू राहू शकते,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यापूर्वी प्राप्त झालेल्या नोटीसीनंतरही आता पुन्हा धनादेश अनादराच्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्याने शासनाकडून संस्थेला आर्थिक मदत मिळणार का आणि संस्थेवरील आर्थिक संकटातून मार्ग कसा निघणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button