Uncategorized

पोहंडूळ येथील शेतरस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात; शेतकऱ्याचा शेतीकडे जाण्याचा मार्ग बंद


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील मौजा पोहंडूळ येथील शेत सर्वे नं. ४९/३/३ मधील शेतजमिनीपर्यंत जाणारा पारंपरिक भोसरा ते पोहंडूळ पांदण रस्ता शेजारील शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून बंद केल्याची तक्रार शेतकरी आनंदराव नथ्थू चंद्रवंशी यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित पांदण रस्ता नकाशावर अस्तित्वात असूनही शेजारील शेतकऱ्यांनी तो वहिवाटीत घेऊन बंद केला आहे. त्यामुळे तक्रारदाराला आपल्या शेतात जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला असून शेतीकडे जाण्यास दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
शेतरस्ता बंद झाल्याने शेतीच्या कामांसाठी अडचणी निर्माण होत असून शेतमालाची वाहतूक तसेच शेतीची मशागत करणेही कठीण झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना शेतापर्यंत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजना सुरू केली असताना प्रत्यक्षात अस्तित्वातील पांदण रस्ताच बंद असल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारदाराने शासकीय अभिलेखानुसार भोसरा ते पोहंडूळ पांदण रस्त्याची मोजणी करून रस्त्याची हद्द निश्चित करावी, तसेच रस्त्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण नियमानुसार काढून हा रस्ता सर्व शेतकऱ्यांसाठी पूर्ववत खुला करावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून पांदण रस्ता पूर्ववत खुला करण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती महसूलमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button