लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त चार गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून शिक्षणाची जबाबदारी उचलली – शिवमती सरोजताई देशमुख यांचा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम

उमरखेड : प्रियदर्शनी इंदिरा गांधी शिक्षण संस्था संचालित देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय, उमरखेड येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक बांधिलकी, समता आणि सेवाभावाचा संदेश देत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रम संस्थेच्या संचालिका शिवमती सरोजताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्रीराम बिजोरे, गजानन चौतमाल, बालाजीराव शिंदे, दत्तक विद्यार्थ्यांच्या पालकांमधून मीनाताई गड्डमवार, मनीषा इंगोलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. वानखेडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लोमटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेच्या स्थापनेपासूनच शिवमती सरोजताई देशमुख या अनाथ, निराधार तसेच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी निस्वार्थ भावनेने उचलत आहेत. इतकेच नव्हे, तर दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्या आई-वडील असूनही अत्यंत गरीब, होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारतात. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च, शालेय साहित्य, गणवेश व आवश्यक शैक्षणिक गरजांची जबाबदारी स्वीकारून त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, शिक्षण आणि वंचितांच्या उन्नतीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देत आहेत. समाजसेवा ही केवळ घोषणा नसून कृतीतून जगलेले जीवनमूल्य आहे, हे त्या आपल्या अविरत कार्यातून सिद्ध करत आहेत.
यंदाही त्यांनी विद्यालयातील आर्यन नितीन गड्डमवार, सक्षम नितीन गड्डमवार, कृष्णा गोविंद इंगोलकर आणि कु. नंदिनी गोविंद इंगोलकर या चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. या विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य, गणवेश प्रदान करून त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यात आली.
यानंतर विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनीही अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा कृतीतून जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात शिवमती सरोजताई देशमुख म्हणाल्या, “समाजाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे समाजातील गरजू, वंचित आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपणही हातभार लावणे हे प्रत्येक सक्षम व्यक्तीचे सामाजिक कर्तव्य आहे. एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणे म्हणजे त्याच्या संपूर्ण भविष्याला नवी दिशा देणे होय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा खरा सन्मान त्यांच्या जयंतीला केवळ अभिवादन करून नव्हे, तर त्यांच्या विचारांचे कृतीत रूपांतर करूनच होऊ शकतो.”
कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ एक औपचारिक कार्यक्रम न ठरता, शिक्षणाच्या माध्यमातून वंचित विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा आणि समता, सामाजिक उत्तरदायित्व व मानवतेचा संदेश कृतीतून देणारा प्रेरणादायी आदर्श ठरला.



