महागावात रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरात 24 जुलै 2026 रोजी प्रस्तावित रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महागाव पोलिसांनी आयोजकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 168 अन्वये नोटीस बजावली आहे.
महागाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांच्या आदेशानुसार ही नोटीस आंदोलनाचे आयोजक शैलेश कोपरकर यांना देण्यात आली. नोटीसमध्ये दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरण आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कथित बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ महागाव बसस्थानक येथे रस्ता रोको आंदोलन करून तहसील कार्यालयावर निवेदन देण्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37(1)(3) अन्वये जमावबंदी आदेश लागू असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारचे भडकाऊ भाषण, घोषणाबाजी, बॅनर, पोस्टर किंवा होर्डिंगचा वापर होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, सार्वजनिक शांतता, शासकीय व खासगी मालमत्तेचे संरक्षण आणि जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
ही नोटीस 23 जुलै 2026 रोजी महागाव पोलीस स्टेशनमार्फत संबंधितांना बजावण्यात आली आहे.



