शहर

महागावात उद्या रस्ता रोको आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, शैक्षणिक सुधारणा आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ महागाव येथे शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता बसस्टँड चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि डीवायएफआय (DYFI) तालुका समिती, महागाव यांच्या वतीने महामहिम राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात दिल्लीतील जंतर-मंतर येथे शैक्षणिक प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, शैक्षणिक धोरणात सुधारणा कराव्यात, NEET व इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांना आळा घालावा, तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर झालेल्या कारवाईचाही निषेध निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी सभापती डी. बी. नाईक, देविदास मोहकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग मुळे, किसान सभा अध्यक्ष दत्तराव खंदारे, दिलीप भिसे, बाळासाहेब रणमले, गणेश तिघलवाड, विठ्ठल धावस, दीपक देशमुख, रमेश जाधव, शेख इसाक यांच्यासह इतर कार्यकर्ते करणार आहेत.
या आंदोलनाला विविध संघटना व पक्षांनी पाठिंबा दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून, महागाव तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button