शहर

जंतर-मंतर आंदोलनावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ उमरखेडमध्ये संताप; विविध पक्ष व विद्यार्थ्यांचे आंदोलन, राष्ट्रपतींकडे हस्तक्षेपाची मागणी

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड | नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 23) उमरखेड येथील महात्मा गांधी चौकात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईची न्यायालयीन किंवा स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली.

आंदोलकांचे म्हणणे आहे की, देशभरातील विद्यार्थी व युवक मागील महिनाभरापासून पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि विविध शैक्षणिक प्रश्नांवर शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करीत होते. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला आणि अनेक विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात काँग्रेसचे तातु देशमुख, राम देवसरकर, अनिल पाटील तिवडीकर, ॲड. शिवाजीराव वानखेडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ॲड. बळीराम मुटकुळे, राजेश खामनेकर, संदीप ठाकरे, डॉ. अजय नरवाडे, राहुल सोनुने, संतोष जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे भास्करराव पंडागळे, राजुभैया जयस्वाल, सरोज देशमुख, स्वप्नील कनवाळे, दिनेश रावते तसेच राहुल मोहितवार, डॉ. अंबेजोगाईकर आणि विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करून, भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक घटनात्मक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अनेक वक्त्यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असून, त्यावर बळाचा वापर होणे गंभीर बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन किंवा स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महात्मा गांधी चौक परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button