एसआयआरचे 100% काम पूर्ण झाल्याचा सत्कार; प्रभाग ११ मधील अनेक नागरिकांना फॉर्मच मिळाले नसल्याचा आरोप

उमरखेड वार्ता |
उमरखेड : उमरखेड नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ११ मध्ये एसआयआर (Special Intensive Revision) फॉर्म भरण्याच्या कामासाठी नियुक्त श्री. विजयराव सूर्यवंशी व त्यांना सहकार्य करणाऱ्या कु. अंजली राजपूत यांचा एसआयआरचे १०० टक्के काम पूर्ण केल्याच्या निमित्ताने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अजय कुरवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मात्र या सत्कारानंतर प्रभागातील नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिक अक्षय गोस्वामी यांनी उमरखेड वार्ताशी संवाद साधताना दावा केला की, त्यांच्या परिसरातील अनेक कुटुंबांपर्यंत एसआयआरचे फॉर्म अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेजारील एका कुटुंबातील चारही फॉर्म अद्याप मिळालेले नसताना “१०० टक्के काम पूर्ण” झाल्याचा दावा आणि त्यानिमित्त झालेला सत्कार हा प्रश्न निर्माण करणारा आहे.
अक्षय गोस्वामी यांनी असा सवाल उपस्थित केला की, प्रभागातील सर्व नागरिकांपर्यंत फॉर्म पोहोचल्याची प्रत्यक्ष खात्री न करता १०० टक्के काम पूर्ण झाल्याचे प्रमाणित करण्यात आले का? मुख्याधिकारी यांनी कोणत्या अहवालाच्या किंवा पडताळणीच्या आधारे संबंधितांचा सत्कार केला? याची माहिती नागरिकांना मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रभाग क्रमांक ११ मधील काही नागरिकांचाही दावा आहे की, अनेक घरांमध्ये एसआयआरचे फॉर्म अद्याप पोहोचलेले नाहीत. जर हे दावे सत्य असतील, तर १०० टक्के काम पूर्ण झाल्याचा अहवाल आणि त्यानंतर झालेला सत्कार याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
नागरिकांनी संबंधित निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाहीर करावी, चुकीचा अहवाल सादर झाल्याचे आढळल्यास नियमानुसार जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर संबंधित अधिकारी किंवा सत्कार झालेल्या व्यक्तींची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तेही प्रसिद्ध करण्यात येईल.



