शहर

रेतीमाफियांची वाढती दहशत; पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या, प्रशासनाला कारवाईची मागणी


पुसद
अवैध रेती तस्करीमुळे निर्माण झालेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांनाच आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याने पुसदमध्ये गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुसद येथील सर्व पत्रकारांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने कठोर कारवाई करण्याची व पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अवैध रेती उत्खनन व चोरट्या वाहतुकीतून शासनाच्या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असून, या अवैध व्यवसायातून रेतीमाफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. महसूल विभाग व पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले, मारहाण, दमदाटी तसेच जीवे मारण्याचे प्रयत्न वारंवार होत असल्याने कारवाई करणाऱ्या यंत्रणेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच वृत्तमाध्यमांतील बातम्यांमुळेच अनेकदा प्रशासनाला अवैध रेती तस्करीविरोधात कारवाई करावी लागते. मात्र, अशा कारवायांनंतर रेतीमाफियांचा रोष पत्रकारांवर निघत असून त्यांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर वंदे भारत न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शेख महेबूब शेख इब्राहिम यांना मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने फोन करून अवैध रेती तस्करीसंदर्भातील बातम्यांचा उल्लेख करत “शिवीगाळ करून बंदुकीची गोळी मारून जीवाने ठार करतो,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वसंत नगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (एन.सी.आर. क्र. ०६०२/२०२५) नोंदविला. मात्र, एवढ्या गंभीर स्वरूपाच्या धमकीनंतरही केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पुढील कठोर कारवाई न झाल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रेतीमाफियांचे मनोबल वाढत असल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली.
पत्रकारांवरील धमक्या या केवळ प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी नसून महसूल व पोलीस प्रशासनालाच अप्रत्यक्ष आव्हान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई करावी, पत्रकाराला संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली.
या मागणीचे निवेदन पत्रकार अॅड. अनिल ठाकूर, अहमद पठाण, ज्ञानेश्वर मेटकर, मारोती भस्मे, उमेश जाजू, संजय रेक्कावार, नवाज अली, मनीष दशरथकर, दीपक धर्माधिकारी, सय्यद अकिब रिझवी, अॅड. प्रदीप नरवाडे, अब्दुल हमीद, विष्णू धुळे, कैलास श्रावणे, किशोर कांबळे, अनिल चेंडकाळे, दिनकर गुल्हाने, बाबूलाल राठोड, सुनील सिंह काकण, बाबा खान, विजय निखाते, सुनील गंगाखेडे, प्रकाश खिल्लारे, मोहम्मद हनीफ, शब्बीर शेख, राजू सोनूने, बाबाराव उबाळे, शंकर माहुरे राजेश ढोले विजय निखातेआदी पत्रकारांनी संयुक्तपणे सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button