हिमायतनगरच्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा धोका टळला; नगरसेवक प्रतिनिधी तथा काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांच्या जोरदार पाठपुराव्यामुळे अखेर ४ गतिरोधक बसवण्यात यश

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या नांदेड-आदिलाबाद मुख्य राष्ट्रीय महामार्गावर सध्या नागरिकांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. विशेषतः ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा बायपास मार्ग आणि खुबा मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे या भागात स्थानिक लोकांची सतत ये-जा असते. या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, महामार्गावरून अतिवेगाने धावणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे येथे सतत भीषण अपघाताची गंभीर शक्यता निर्माण झाली होती.
नागरिकांच्या जिवाचा हा अत्यंत गंभीर धोका ओळखून वार्ड क्रमांक १४ चे लोकप्रिय नगरसेवक प्रतिनिधी तथा काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष (नांदेड) फेरोज खान यांनी प्रशासनाकडे अत्यंत आक्रमक व जोरदार पाठपुरावा केला. त्यांच्या याच सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे अखेर महामार्गावरील हजरत उमर चौक कमानच्या ‘फोर-पॉइंट’जवळ २ आणि कालोटी हॉटेलच्या ‘टी-पॉइंट’जवळ २ असे एकूण ४ महत्त्वपूर्ण गतिरोधक (स्पीड ब्रेकर) तातडीने टाकण्यात आले आहेत.
या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक झाल्यामुळे आता वेगवान वाहनांना चांगलाच ब्रेक लागला असून संभाव्य अपघातांचा मोठा धोका आता पूर्णपणे टळला आहे. हिमायतनगर शहरातील या उत्कृष्ट आणि सुरक्षिततेच्या जनहितार्थ कामाबद्दल जनतेने नगराध्यक्ष रफिक आणि नगरसेवक प्रतिनिधी तथा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांचे मनापासून जाहीर आभार मानले आहेत.



