महागाव नगरपंचायतीच्या निविदा रद्द करा; अन्यथा १३ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीमार्फत जिल्हा वार्षिक योजना, अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजना आणि घनकचरा व्यवस्थापन योजनांअंतर्गत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित निविदा तात्काळ रद्द कराव्यात, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश दिलीपराव सुरेश (कोपरकर) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, निविदा प्रक्रियेत शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून स्पर्धात्मक वातावरण नष्ट करून विशिष्ट कंत्राटदारांना लाभ मिळावा, या उद्देशाने अटी घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरीपेक्षा अधिक कालावधीची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामांना स्थगिती द्यावी, दोषी मुख्याधिकारी, अभियंते व इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास १३ जुलै २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



