Uncategorized

बेलगव्हाण येथे लोकनायक बापूजी अणे यांना अभिवादन; जंगल सत्याग्रहाच्या स्मृतींना उजाळा


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक बेलगव्हाण जंगल सत्याग्रहाच्या स्मृतिदिनानिमित्त १० जुलै रोजी बेलगव्हाण येथे लोकनायक बापूजी अणे यांना अभिवादन करण्यात आले. गेल्या दोन दशकांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
१० जुलै १९३० रोजी लोकनायक बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली बेलगव्हाण येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. सविनय कायदेभंग आंदोलनाचा एक भाग म्हणून झालेल्या या आंदोलनात स्वातंत्र्यसैनिकांनी चांदीच्या विळ्याने गवत कापून ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रतीकात्मक आंदोलन केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक देशभक्तांना तत्कालीन ब्रिटिश सरकारने अटक करून तुरुंगवासाची शिक्षा दिली होती.
स्वातंत्र्य चळवळीत पुसद शहराचेही विशेष महत्त्व राहिले आहे. लोकमान्य टिळक यांनी पूस नदीच्या तीरावर सभा घेऊन स्वातंत्र्याचे विचार जनमानसात रुजवले. तसेच शेतकऱ्यांचे आराध्य दैवत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्यामुळेही पुसदला ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार निलय नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक अनुप मिश्रा, सहाय्यक वनसंरक्षक राजगुरू, शेतकरी नेते मनीष जाधव, माजी सभापती निळकंठराव पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लोकनायक बापूजी अणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे अविनाश पोळकट, संभाजीराव टेटर, विकास राठोड, रविभाऊ गयानचंदानी, प्रा. दिनकर गुल्हाने, अनिल चेंडकाळे, प्रा. लामने, ज्ञानेश्वर तडसे, भारत पाटील, विनोद जिल्हेवार, बेलगव्हाण येथील वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार निलय नाईक यांनी आपल्या भाषणात लोकनायक बापूजी अणे यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव करत त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम जोशी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button