मुडाणा येथील कथित अवैध वैद्यकीय सेवेबाबत चौकशीची मागणी; ग्रामीण भागातील दवाखान्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मुडाणा येथे एका कथित ‘बंगाली डॉक्टर’कडून विनापरवाना वैद्यकीय सेवा दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी रुग्णांना सलाईन, इंजेक्शन तसेच विविध आजारांवर उपचार करून बेडवर भरती केले जात असल्याची चर्चा आहे. संबंधित व्यक्तीकडे आवश्यक वैद्यकीय पात्रता, नोंदणी व शासनमान्यता आहे की नाही, याची आरोग्य विभागाने पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की, महागाव तालुक्यातील मुडाणा, काळी दौलतखान, फुलसांगवी, मोरत, पोखरी आदी भागांत अशा प्रकारचे दवाखाने सुरू असून त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याने ग्रामीण भागात विनापरवाना वैद्यकीय सेवा वाढत आहे. काही मेडिकल मधून परवानगी नसताना बॉम्बे मार्केटच्या गोळ्या ह्या डॉक्टरला दिल्या जातात व ते नागरिकांना देतात याबाबत गंभीर आरोप नागरिकांनी केले आहे.या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित दवाखान्यांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने संबंधित दवाखान्यांची वैद्यकीय पात्रता, नोंदणी, औषधसाठा आणि उपचार पद्धतीची सखोल चौकशी करून नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



