शहर

हर हर महादेव’च्या जयघोषात उमरखेडहून अमरनाथ यात्रेला भक्तांचे प्रस्थान !पाणी, फराळ व औषधांचे सेवाभावी वाटप !!


एस पी दळवी
उमरखेड :
श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला येथील बाबा बर्फानी यात्रा या सामाजिक संघटनेच्या वतीने ३० भाविक भक्त पवित्र अमरनाथ यात्रेसाठी दि १० रोजी सकाळी ७ वाजता महात्मा गांधी चौकातून उत्साहात रवाना झाले. .
“हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला असून भाविकांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यात्रेकरूंचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा या उद्देशाने दत्ता जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विशेष सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संजय बालाप्रसाद श्रीवास्तव व सचिव संजय दत्तात्रय ससाने यांच्या हस्ते यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, प्रवासासाठी पौष्टिक फराळ तसेच सर्दी, खोकला, ताप यांसारख्या सामान्य आजारांवरील आवश्यक गोळ्या व औषधांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे भाविकांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या यात्रेचे संपूर्ण नियोजन बाबा बर्फानी सामाजिक संघटनेचे आयोजक दत्ता माकोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यात्रेचा पहिला टप्पा उमरखेड ते नांदेड असा खाजगी वाहनाने होणार असून, त्यानंतर नांदेड येथून जम्मू-तावी पर्यंत रेल्वेने आणि पुढे जम्मूहून अमरनाथकडे बसमार्गे भाविकांचा प्रवास होणार असल्याची माहिती आयोजक दत्ता माकोडे यांनी दिली.
अमरनाथ यात्रा ही देशातील अत्यंत कठीण आणि श्रद्धेची यात्रा म्हणून ओळखली जाते. लांबचा प्रवास, बदलते हवामान आणि डोंगराळ मार्ग यामुळे यात्रेकरूंना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत दत्ता जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेने यात्रेकरूंच्या आरोग्याची व सोयीची काळजी घेत केलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
उमरखेडमधील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देत त्यांच्या सुखरूप यात्रेसाठी भगवान भोलेनाथ चरणी प्रार्थना केली. सेवाभाव, श्रद्धा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा उत्तम संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button