अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी झटणाऱ्या ॲड. शिवाजीराव वानखेडे यांचा भव्य नागरी सत्कार; उमरखेडच्या न्यायलढ्याला नवी दिशा

उमरखेड, दि. ९ जुलै :
उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (ADJ) मंजूर व्हावे, यासाठी सातत्याने कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणारे उमरखेड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव वानखेडे यांचा ॲड. आशिष देशमुख यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी वकील संघाचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी आणि अनेक विधिज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना ॲड. आशिष देशमुख यांनी सांगितले की, अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ॲड. शिवाजीराव वानखेडे यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांची भेट घेऊन उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी केली. तेव्हापासून त्यांनी हा विषय केवळ ठरावापुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून सातत्याने पुढे नेला आहे.
या मागणीसाठी त्यांनी स्वतःचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च करून पाच वेळा मुंबई येथे संबंधित यंत्रणांकडे निवेदने सादर केली, तसेच नागपूर येथे प्रमुख न्यायमूर्तींची अनेक वेळा भेट घेऊन न्यायालय मंजुरीचा पाठपुरावा केला. याशिवाय जिल्हा न्यायाधीशांशी नियमित संपर्क ठेवून या मागणीची सातत्याने आठवण करून दिली आहे.
उमरखेड वकील संघाच्या माजी अध्यक्षांनीही ॲड. शिवाजीराव वानखेडे यांच्या कार्याचा गौरव करत, न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी त्यांनी केलेला संघर्ष कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अत्यंत आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी ॲड. आशिष देशमुख यांनी “उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होण्याची प्रक्रिया सकारात्मक दिशेने सुरू असून, लवकरच याबाबत आनंदाची बातमी मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.
उमरखेडसारख्या मोठ्या तालुक्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाल्यास नागरिकांचा वेळ, पैसा आणि न्याय मिळण्यातील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे या मागणीकडे आता शासन आणि न्यायव्यवस्थेने सकारात्मक दृष्टीने पाहून लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विधी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.



