पांदण रस्ते तातडीने मोकळे करून मुरूम टाकावा; शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात जाणारे पांदण रस्ते तातडीने मोकळे करून त्यावर मुरूम टाकून वाहतुकीयोग्य करावेत, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. पावसाळा व खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यामुळे पेरणी व शेतीची कामेही प्रभावित होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वाघनाथ, वडद, कासाळबेळ, सेवानगर, हिवरा, पोखरी, माळवाघद, सवना, मुडाणा आदी गावांतील शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाने पांदण रस्त्यांबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. शेतामध्ये जाणारे रस्ते मोकळे झाल्यास शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेत करता येतील, वाहतुकीचा खर्च कमी होईल तसेच रस्त्यांवरून होणारे वादही टळतील, असे त्यांनी नमूद केले.
तहसील कार्यालय तसेच नायब तहसीलदारांकडे पांदण रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, जेणेकरून खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणताही अडथळा येणार नाही, अशीही मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियम व शासन निर्णयानुसार (जीआर) पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच शेतरस्त्यांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी दिलीप हाटेले वाघनाथ याची पेरणी सुद्धा बाकी आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रस्त्याची मागणी केली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.



