शहर

विद्यार्थी चटईवर, प्रशासन झोपेत; तीन दिवसांत डेस्क-बेंच व शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा

उमरखेड, दि. ८ जुलै :
उमरखेड नगर परिषदेच्या अखत्यारीतील ए.पी.जे. अब्दुल कलाम नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा गंभीर आरोप करत पालक समितीचे अध्यक्ष अहेमद शेख मुस्तफा यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तीन दिवसांत डेस्क-बेंच उपलब्ध करून देण्याची आणि चार शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शाळेला कुलूप ठोकून तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनानुसार, गेल्या वर्षभरापासून नगर परिषद प्रशासन, नगराध्यक्ष, शिक्षण सभापती आणि लोकप्रतिनिधींना वारंवार लेखी व तोंडी मागणी करूनही शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क-बेंच उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आजही चटईवर बसून शिक्षण घेत आहेत.

याहूनही गंभीर बाब म्हणजे वर्गखोल्यांतील फरशी फुटून मोठे खड्डे पडले असून त्या ठिकाणी साप व विंचू निघत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीतही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शाळेत शिक्षकांची मोठी कमतरता असून चार शिक्षकांची पदे तातडीने भरण्याची मागणीही करण्यात आली आहे. पुरेशा शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पालक समितीचे अध्यक्ष अहेमद शेख मुस्तफा यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तीन दिवसांच्या आत डेस्क-बेंच उपलब्ध करून शिक्षकांची नियुक्ती न केल्यास ए.पी.जे. अब्दुल कलाम नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळेला कुलूप ठोकण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस नगर परिषद प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या निवेदनाच्या प्रती नगराध्यक्षा, शिक्षण सभापती, नगर परिषद सदस्य, विरोधी पक्षनेते तसेच उमरखेड पोलीस ठाण्यालाही देण्यात आल्या असून, आता नगर परिषद प्रशासन विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांबाबत किती तत्परतेने निर्णय घेते याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button