Uncategorized

आंदोलनानंतरच बांधकाम विभागाला जाग? गुंज–कलगाव मार्गावर घाईघाईने मुरूम टाकण्यास सुरुवात; ग्रामस्थांचा आरोप


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
गुंज–कलगाव मार्गावरील डागडुजीच्या नावाखाली सुमारे एक कोटी रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या कामाची चौकशी होऊ नये म्हणून घाईघाईने रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सवना, गुंज, कलगाव, वेणी व वाकोडी परिसरातील ग्रामस्थांनी ६ जुलै २०२६ रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन दिले होते. या निवेदनात सात दिवसांच्या आत दर्जेदार काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले होते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनाची दखल विविध वृत्तपत्रांनी घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ जुलै २०२६ रोजी रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. मात्र हे काम केवळ दिखाव्यासाठी व चौकशी टाळण्यासाठी सुरू करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
रस्त्यावरील पूर्वीच्या डागडुजीच्या कामात अनियमितता झाली असून त्याची निष्पक्ष चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून दर्जेदार रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, केवळ वरवरची डागडुजी करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. दर्जेदार व कायमस्वरूपी रस्ता पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करण्यात येणार असून, परिसरातील जनता यावेळी अधिक तीव्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button