Uncategorized

मलकापूर (चिखली) व पोखरीमध्ये अवैध गावठी दारूचा महापूर; महिलांचा पोलिसांना इशारा, कारवाईची मागणी


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मलकापूर (चिखली) व पोखरी या आदिवासीबहुल गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हातभट्टी व अवैध देशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी एकत्र येत महागाव पोलीस ठाण्यात निवेदन देऊन अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली असून, अन्यथा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, अवैध दारूमुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारूच्या व्यसनामुळे काही नागरिक विविध आजारांना बळी पडत असून अनेकांचे अकाली मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच गावात वारंवार भांडणे, वाद-विवाद आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी प्रभारी ठाणेदारांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाया होत होत्या. मात्र सध्या कारवाईचा वेग मंदावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार वानखडे यांनी पदभार स्वीकारला असून, ते अवैध दारू व्यवसायाविरुद्ध कोणती ठोस कारवाई करतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनात अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून हा व्यवसाय कायमचा बंद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची तातडीने दखल न घेतल्यास येत्या काळात महागाव पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महिलांनी प्रशासनाला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button