शहर

उमरखेडमधील भारत पेट्रोलियम पंपाचा परवाना रद्द करण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज, पुरवठा तात्काळ बंद करण्याचीही मागणी

उमरखेड, दि. ३ जुलै :
उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या रिटेल आउटलेट (कोड क्र. 115826) विरोधात समाजसेवक बसवेश्वर नंदकुमार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे सविस्तर कायदेशीर अर्ज दाखल करून संबंधित पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत पेट्रोल व डिझेलचा पुरवठा तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

अर्जात असा आरोप करण्यात आला आहे की, संबंधित पेट्रोल पंपाने पेट्रोलियम रूल्स, 2002 मधील नियम 152(3), सुरक्षा नियम, स्फोटक कायद्याच्या तरतुदी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी भाडेपट्ट्यात घातलेल्या अटींचे उल्लंघन केले आहे. याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आलेले राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रातील अतिक्रमण अद्यापही कायम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अर्जानुसार, संबंधित पेट्रोल पंपाच्या टाक्या अतिक्रमित क्षेत्रात असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दर्शनास अडथळा निर्माण होत असून, शिवजयंतीसह सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही अडचणी येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अर्जात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, संबंधित पेट्रोल पंपावर आवश्यक असलेली ग्राहक सुविधा उपलब्ध नाही. पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अग्निसुरक्षा यंत्रणा, मोफत हवा भरण्याची सुविधा यांचा अभाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या परिसरात यापूर्वी अनेकदा वाद, आंदोलने आणि उपोषणे झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर अर्जदाराने जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, मुख्य अर्जाचा अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित पेट्रोल पंपाला भारत पेट्रोलियमकडून इंधन पुरवठा तात्पुरता बंद करण्याचे आदेश द्यावेत आणि सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक असल्यास परवाना रद्द करण्याची कार्यवाही करावी.

दरम्यान, या अर्जातील आरोपांबाबत संबंधित भारत पेट्रोलियम कंपनी किंवा डीलर यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. अंतिम निर्णय संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या चौकशी व आदेशानंतरच होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button