कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील आनंदनगर येथे कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून साक्षी शिवदास जाधव (वय अंदाजे २८ वर्षे) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मृत महिलेचे वडील सुरेश जिता राठोड (रा. मांडवा, ता. पुसद) यांनी महागाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे महागाव पोलिसांनी अपराध क्रमांक ३५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८०(२), ८५, १०८, ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात पती शिवा शामराव जाधव, दीर विलास शामराव जाधव, सासरे शामराव जाधव, सासू रेणुका शामराव जाधव आणि नणंद शीतल विलास जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पती शिवा जाधव व सासू रेणुका जाधव व सासरा शामराव जाधव यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक छळामुळे साक्षी जाधव यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सवना येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण आणि संबंधितांच्या भूमिकेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.



