मुळावा परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी; गजानन कांबळे यांचे निवेदन

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
मुळावा, ता. उमरखेड : पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळावा परिसरात अवैध मटका, वरली आणि पत्त्यांच्या जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गजानन मारुती कांबळे (रा. सुकळी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) यांनी केला आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अवैध धंदे नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कांबळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुळावा परिसर तसेच दत्तकृपा हॉटेलजवळ अवैध मटका, वरली आणि इतर बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप आणि माहिती त्यांनी विविध सामाजिक माध्यमांच्या समूहांवर प्रसारित केल्याचेही सांगितले आहे.
तसेच, परिसरात एका ‘बादशाह (पत्त्याचा)क्लब’सह काही क्लब नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या अवैध धंद्यांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्याला बळी पडत असल्याने गंभीर सामाजिक संकट निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिक खत-बियाण्यांच्या कामासाठी मुळाव्यात येत असताना या अवैध धंद्यांमुळे आर्थिक नुकसान होऊन अनेकजण कर्जबाजारी होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच, मोठ्या माफियांवर कारवाई होत नसून गोरगरिबांवरच कारवाई केली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
यवतमाळ एलसीबी पथक, उमरखेड डीबी पथक तसेच पोफाळी पोलीस ठाण्याने मटका, वरली आणि बावन्न पत्त्यांच्या जुगार अड्ड्यांवर तातडीने छापे टाकून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
टीप : वरील आरोप हे गजानन कांबळे यांनी केलेल्या निवेदनावर आधारित असून, संबंधित आरोपांबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. आरोपांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.



