मशाल’ पेटली अन् वॉर्ड क्रमांक ८ चा कायापालट झाला! तरुण नगरसेवक जीशान मिर्झांचा ‘सुपरफास्ट’ विकासधडाका; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी, शेख खय्यूम):
लोकप्रतिनिधी कसा असावा आणि त्याने जनतेच्या सुख-दुःखात कसं धावून जावं, याचं एक उत्तम उदाहरण हिमायतनगरच्या वॉर्ड क्रमांक ८ मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या समस्या आणि काँग्रेस सत्ताधाऱ्यांची उदासीनता या सर्व गोष्टींना बाजूला सारत, ‘मशाल’ या चिन्हावरून पहिल्यांदाच निवडून आलेले तरुण आणि तडफदार नगरसेवक जीशान मिर्झा यांनी वॉर्डात विकासकामांचा असा काही धडाका लावला आहे की, संपूर्ण वॉर्डातील जनता आज आनंदाने भारावून गेली आहे.
एकाच दिवसात पाण्याचा प्रश्न मिटवला; बाबू भाई व नागरिकांचा जल्लोष
नुकतीच वॉर्डातील मुख्य पाण्याची मोटर अचानक खराब झाल्यामुळे संपूर्ण परिसराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. ऐन उन्हाळ्यात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिक चिंतेत होते. मात्र, जनतेची ही अडचण समजताच नगरसेवक जीशान मिर्झा यांनी कोणतीही दिरंगाई न करता, स्वतः पुढाकार घेऊन अवघ्या २४ तासांच्या आत नवीन मोटर आणून बसवली आणि पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला.
या तात्काळ आणि ‘सुपरफास्ट’ कारवाईवर वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक बाबू भाई आणि इतर रहिवासी अत्यंत आनंदी झाले आहेत. “आता पाण्याचा कोणताही ताण उरलेला नाही, मिर्झा साहेबांनी तात्काळ चोख व्यवस्था करून दिली,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हायटेक पद्धतीने स्वच्छता; मलब्याचा जागीच निपटारा
नेहमीच्या पद्धतीनुसार इतर वॉर्डांमध्ये नाल्यांची स्वच्छता करताना फक्त गाळ काढून रस्त्यावर टाकला जातो, जो वाळल्यावर पुन्हा नालीत जातो. पण जीशान मिर्झा यांनी कोणतीही जुनी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अत्यंत आधुनिक आणि व्यावसायिक विचार केला. त्यांनी वॉर्डात थेट जेसीबी (JCB) लावून नाल्यांची खोलवर खणती केली आणि नालीतून निघालेला संपूर्ण गाळ त्याच वेळी ट्रॅक्टरमध्ये भरून थेट शहराबाहेर हटवून दिला. यामुळे वॉर्डात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबला असून रस्ते स्वच्छ आणि सुंदर दिसत आहेत.
”काँग्रेसचे नगरसेवक न मिळाल्याचे बरेच झाले…” – सत्ताधाऱ्यांवर नागरिकांचा तीव्र रोष
जीशान मिर्झा यांचे हे गतिमान काम पाहून वॉर्ड क्रमांक ८ मधील लोकांमध्ये आज केवळ आनंदच नाही, तर एका नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. वॉर्डातील नागरिक आता उघडपणे बोलू लागले आहेत की, “काँग्रेसची सत्ता असूनही जे काम सत्ताधारी पक्षाचे लोक करू शकले नाहीत, ते काम विरोधी पक्षाच्या या तरुण नगरसेवकाने करून दाखवले. काँग्रेसचा नगरसेवक न मिळाल्याचे एक प्रकारे बरेच झाले!”
नागरिकांच्या मते, जे अनुभवी लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षे केवळ शांतपणे तमाशा पाहत बसले आहेत, त्यांनी आता या तरुण रक्ताकडून काम करण्याची खरी पद्धत शिकली पाहिजे. विरोधी पक्षात असतानाही केवळ जनतेच्या हिताला प्राधान्य देत वॉर्डाचा विकास करणाऱ्या जीशान मिर्झा यांच्यावर सध्या संपूर्ण हिमायतनगर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



