पुसदमध्ये गोळीबाराचा थरार; चौघांचा हल्ला, आरोपी वाहन सोडून फरार

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद, २३ जून: पुसद शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) परिसरात सोमवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार व हल्ल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील मिश्रा यांच्या कँटीनवर अंजुम खान लियाकत अली खान व त्याचे दोन मित्र चहा घेत बसले होते. त्यावेळी एका चारचाकी वाहनातून आलेल्या चार जणांनी अचानक खाली उतरून दोन राऊंड गोळीबार केला. त्यानंतर कँटीन चालक शुभम जगदीश मिश्रा (वय ३०) तसेच अंजुम खानचे मित्र समीर शेख व सुलतान शेख यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हल्ल्यादरम्यान अंजुम खानने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीवरून उडी मारून आपला जीव वाचवला दरम्यान, हल्लेखोरांनी आपले चारचाकी वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले.
सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, वसंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.



